• स्क्रीन रीडर प्रवेश
 • A-AA+
 • NotificationWeb

  Title should not be more than 100 characters.


  0

Asset Publisher

अलिबाग

अलिबाग हे एक किनारपट्टीवरील शहर आहे ज्याला 'मिनी गोवा' असेही म्हटले जाते जे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे. हे रायगड जिल्ह्याचे मुख्य शहर तर आहेच तसेच स्वच्छ किनारे आणि निसर्गरम्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सुट्टीसाठीचे आवडते ठिकाण आहे .

जिल्हा/विभाग        

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत. 

ऐतिहासिक माहिती 

अलिबाग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोकण विभागातील शहर आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबागमध्ये एक चुंबकीय वेधशाळा आहे जी १९०४ मध्ये स्थापन करण्यात आली होती, जी आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमद्वारे चालवली जाते.

भौगोलिक माहिती

अलिबाग हे महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात सह्याद्री पर्वत रांगा आणि अरबी समुद्राच्या मध्ये येतं. अलिबाग हे तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले आहे. मुंबईपासून अंदाजे ९७ किमी आणि पुण्यापासून १६७ किमी दूर आहे.

हवामान

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे 2500 मिमी ते 4500 मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. इथे उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे 28 अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

अलिबाग पॅरासेलिंग, बनाना बोट राईड्स, जेट-स्कीइंग, सर्फिंग इत्यादीसारख्या जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच कॅम्पिंग आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.

पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारीचा आनंद घेतात. या विशिष्ट पर्यटनाव्यतिरिक्त, अलिबाग हे कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल आणि रेवदंडा किल्ला या वारसा स्थळांसाठीही ओळखले जाते.

जवळची पर्यटनस्थळे        

अलिबागसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

 • मुरुड जंजिरा किल्ला: किल्ला मुरुडच्या किनाऱ्यापासून पुढे समुद्रात आहे.
 • फणसाड पक्षी अभयारण्य: अलिबागपासून ४२ किमी अंतरावर रेवदंडा-मुरुड मार्गावर आहे.
 • रेवदंडा किनारा आणि किल्ला: अलिबागच्या दक्षिणेस १७ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण पोर्तुगीज किल्ला आणि रेवदंडा बीचसाठी प्रसिद्ध आहे.
 • कोरलाई किल्ला: अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून २३ किमी दक्षिणेजवळ पोर्तुगीजांनी बांधलेल्या मोठ्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला जिथे सात हजार (७०००) घोडे राहू शकतात, एवढा मोठा आहे.
 • कुलाबा किल्ला: चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या अरबी समुद्रात वसलेला हा तीनशे पेक्षा जास्त वर्ष जुना लोकप्रिय किल्ला पर्यटकांच्या आकर्षणापैकी एक आहे.
 • वरसोली बीच: पर्यटकांनी कमी भेट दिलेला समुद्रकिनारा, जो भारतीय लष्करासाठी नौदल तळ म्हणून प्रसिद्ध आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

 • अलिबागला रस्ते, रेल्वे तसेच जलमार्गाने पोहोचता येतो. अलिबाग राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. मुंबई पासून अलिबाग पर्यंत राज्य परिवहन, बस आणि टॅक्सी उपलब्ध आहेत.
 • गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या फेरी बोट देखील उपलब्ध आहेत. मांडवा येथून अलिबागसाठी स्थानिक गाड्या उपलब्ध आहेत.
 • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १०३ किमी.
 • जवळचे रेल्वे स्टेशन: पेण ३३ किमी.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागात असल्याने मासे हे इथले खाद्य-वैशिष्ट्य आहे. पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये विविध प्रकारचे पदार्थ व जेवण मिळते.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

 • अलिबागमध्ये असंख्य हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
 • सिव्हिल हॉस्पिटल समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात आहे.
 • अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिस समुद्रकिनाऱ्यापासून ०.४५ किलोमीटर दूर आहे.
 • जवळचे पोलीस स्टेशन समुद्र किनाऱ्यापासून १.१ किलोमीटर अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

अलिबागमध्ये एमटीडीसी कॉटेज, फार्महाऊस आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

 • हे ठिकाण वर्षभर भेट देता येऊ शकते परंतु पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि त्यामुळे इथे या काळात पर्यटन धोकादायक होऊ शकते. पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
 • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी