संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन
"लाठी गोली खायेंगे, फिरभी बम्बई लेयेंगे !
मुंबई हे एक जागतिक पटलावर नावाजलेले आंतरराष्ट्रीय शहर आणि आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी. आणि याच मुंबई शहराला शूरत्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचे 'हृदय' म्हणजेच 'राजधानी' बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. अर्थात हे सहज शक्य नव्हतं. ही मुंबई महाराष्ट्राला मिळविण्यासाठी १०५ मराठी भाषकांनी हौतात्म्य पत्करले आहे ही बाब विसरता कामा नये !
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ साली लागू झालेला राज्य पुनर्रचना कायदा स्वतंत्र भारताच्या तत्कालीन प्रांतसीमा आणि प्रशासनासंबंधातील पुनर्रचनेचे एक मोठे पाऊल होते. ह्या कायद्याद्वारे भारताच्या विविध प्रांतांच्या सीमा ह्या भाषेच्या आधारावर निश्चित करण्यात आल्या, आणि तसा बदल भारतीय संविधानात देखील करून घेण्यात आला. या कायद्यान्वये सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे, भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ असे म्हणतात. देशाच्या अर्थकारणात अत्यंत महत्वाचे शहर असणारी मुंबई भांडवलदारांना आपल्या दावणीला हवी होती. तिचे स्वतंत्र राज्य त्यांना हवे होते. परंतु ही मुंबई कामगारांनी, मध्यमवर्गीयांनी घडवली होती, ती त्यांची हक्काची होती. स्वतंत्र भारताच्या चळवळीनंतरचे महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन लाभलेले संयुक्त महाराष्ट्राचे हे आंदोलन 'मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या घोषणेनें उभे राहिले. यासाठी मराठी भाषिकांना तीव्र स्वरुपाचे लढे उभारावे लागले.या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते.
सत्याग्रह हे या लढ्याचे मुख्य अस्त्र होते. जात – धर्म – पक्ष - विचारसरणी आदी भेद बाजूला सारून सारा महाराष्ट्र केशवराव जेधे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहीर अण्णा भाऊ साठे, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शाहीर अमर शेख यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकटवला होता. तारा रेड्डी,मालती नगरकर, बायजी पाटील, यामिनी चौधरी, पार्वतीबाई भोर, इंदुताई कुळकर्णी, गिरीजा कदम, मनोरमा हंगल,प्रमिला दंडवते, कुसुम रणदिवे, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार व मध्यमवर्गातील शेकडो महिला विरांगनांनी या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी स्त्रीसामर्थ्याचे दर्शन घडविले होते. आणि शेवटी १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने हे राज्य जन्माला आले. दि.१ मे १९६० पासून 'मुंबईसहित मराठी महाराष्ट्र' असे नवीन राज्य निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडून तो स्वीकारला गेला. म्हणूनच या चळवळीची ज्वलंत आठवण आणि त्या संघर्षमय कालखंडाचे स्मरण करून देणारे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेने दि. ३० एप्रिल २०१० रोजी, दादर येथे उभारण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महत्व, त्यात लढलेले थोर विचारवंत व क्रांतिकारक, या चळवळीचे देशाच्या राजकारणावर झालेले दूरगामी परिणाम तसेच लढ्याच्या स्मृती पुढील पिढीच्या स्मरणात चिरंतन राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव आणि अत्यंत महत्वाचे स्मारक आहे.
दालनाचे वैशिष्टय व दालनात काय बघाल !
या कलादालनाची वास्तू एक मजल्याची आहे.
१) तळ मजल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे, भारत मातेची शिल्पाकृती, दि. १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांतून आणलेली पवित्र माती व महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी एकत्र केलेले दोन मंगल कलश ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे चंद्रावरील दुर्मिळ दगड देखील आपणांस येथे पाहता येईल.
२) संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात प्रवेश केल्यानंतर मुख्य मजल्यावर संपूर्ण चळवळीची सुरुवातीपासूनची माहिती सांगणारी छायाचित्रे, त्याकाळी वर्तमानपत्रात आलेल्या चळवळीसंबंधीच्या माहितीची छायाचित्रे अशी अत्यंत अभ्यासपूर्ण व दुर्मिळ माहिती पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
३) प्रथम मजल्यावर मुंबई तसेच महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेण्यांमध्ये पाहावयास मिळणाऱ्या शिल्पांच्या प्रतिकृती व त्यांची माहिती, महाराष्ट्राच्या शूरत्वाचा वारसा सांगणारे गडकिल्ले, लेण्या, महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाने, पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य तसेच महाराष्ट्राची लोककला, संस्कृती शिल्परूपाने दर्शवण्यात आली आहे.
जाण्याचे मार्ग :-
१) दादर हे मुंबईमधील क्रीडा, संस्कृती व राजकारणासाठी प्रसिद्ध स्थळ असून मध्य व पश्चिम रेल्वेने जोडलेले महत्वाचे स्थानक आहे. येथून सदर स्मारकापर्यंत पायी पोहचण्यासाठी १५ मिनिटे लागतात. तुम्ही टॅक्सी चा पर्याय देखील निवडू शकता.
२) रस्ते मार्गाने दादर हे मुंबई - पुणे महामार्गाने जोडलेले असून प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानापासून सदर स्मारक जवळच्या अंतरावर आहे.
३) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सदर स्मारकाचे अंतर हे १३.९ किमी आहे.
४) छत्रपती शिवाजी महाराज देशांतर्गत विमानतळ, सांताक्रुज पासून सदर स्मारकाचे अंतर हे १३.९ किमी आहे १०.६ किमी असून सदर स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी चा पर्याय निवडू शकता.
How to get there

By Road

By Rail

By Air
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
No Hotels available!
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS